Click here to go back
वऱ्हाडी
Image of a calender
June 25 , 2022
Logo of a Customer
आदित्य चव्हाण
Image of a man working on his laptop

जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर १२ कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो. वऱ्हाडी प्रामुख्याने विदर्भाच्या वऱ्हाड भागात म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात बोलली जाते. या बोलीची पाळेमुळे १२व्या शतकातल्या, चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाच्या उदयापर्यंत जातात. अलीकडच्या काळातही अनेक कवींनी त्यांच्या कवितांत अंशतः किंवा संपूर्ण वऱ्हाडीचा वापर केला आहे. उद्धव शेळके, मनोहर तल्हार, मधुकर केचे, गो.नी. दांडेकर, बाजीराव पाटील, नरेंद्र इंगळे, सदानंद देशमुख, रमेश इंगळे उत्रादकर, पुरुषोत्तम बोरकर, आणि इतर अनेक असे लेखक/कवी आहेत की ज्यांनी या बोलीचे सौंदर्य व ताकद वाढवण्यास हातभार लावला आहे. तिसापेक्षाही जास्त वर्षांपासून डॉ.प्रा.विठ्ठल वाघ या बोलीत कविता लिहीत आहेत. त्यांनी वऱ्हाडी बोलीवर एक शोधप्रबंध लिहिला आहे. वऱ्हाडी बोलीभाषेतील म्हणी हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. वाघ यांनी त्यांच्या काव्यगायनाद्वारे, महाराष्ट्राच्या इतर भागांतही वऱ्हाडीला लोकप्रियता मिळवून दिली आहे. मराठीच्या अन्य बोलीभाषांनी केली आहे तशी वऱ्हाडीनेही मराठी भाषा जास्त खुमासदार केली आहे. डॉ. प्रा. विठ्ठल वाघ यांच्या या बोलीभाषेतील कवितांमध्ये,काया मातीत मातीत, तिफन चालते हे एक गाजलेले चित्रपटगीत आहे. डॉ० रावसाहेब मुरलीधर काळे यांनी वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्त्रीय अभ्यास केला आहे. तसेच, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून वऱ्हाडी बोलीचा शब्दकोश, वाक्प्रचार कोश, म्हणी कोश डॉ० विठ्ठल वाघ व डॉ० रावसाहेब काळे यांनी पूर्ण केला आहे. डॉ० रावसाहेब काळे यांचे वऱ्हाडी लोकगीतावरील भूलाबाईचे गाणे हे पुस्तक प्रकाशित आहे. वऱ्हाडी बोलीतील व्हिडिओ कॉलिंग, लांबजान व कुत्रीची हिसेवाटनी असे तीन नाटके डॉ० काळे यांनी लिहिले आहेत.

या बोली भाषेत काही उपप्रकार आहेत. उदा० खडसी वऱ्हाडी, देसी वऱ्हाडी, वरतील्ली, खाल्तील्ली इत्यादी. या उपप्रकारांत थोडयाफार फरकाने शब्द बदलतात. उदा० बैलगाडीला देसी (देस पट्टी)मध्ये ‘बंडी’ तर खडसी (खडसपट्टी)मध्ये ‘खासर’ म्हणतात.

बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील ‘ड’चा ‘ळ’, ‘ळ’चा ‘य’ या बोलीत केला जातो. जसे, ‘नदीच्या गायात, गाय फसली’ (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.